बुलडाणा प्रतिनिधी । राज्यात कोरोना विषाणूपासून उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने दर्शन सुविधा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.
या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या कलमांनुसार गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंध करण्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे मान्यतेने ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवणेबाबत सुचीत करण्यात आले आहे. त्यानुसार कोरेाना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील शेगांव येथे श्री. संत गजानन महाराज संस्थान येथील दर्शन सुविधा आणि आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रमही 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमीत केले आहे.