नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ‘आयटम’ संदर्भातील वादग्रस्त टिप्पणीवरून निवडणूक आयोगानं मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांना स्टार प्रचारक यादीतून वगळण्याचे आदेश दिले आहेत. कमलनाथ यांच्यावर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री इमरती देवी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. डाबरामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुरेशी राजे यांच्या प्रचार सभेत कमलनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी इमरती देवी यांचा उल्लेख करताना ‘आयटम’ हा शब्द वापरला होता. चहुबाजुंनी टीका झाल्यानंतरही कमलनाथ यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार देताना आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं होतं.
मध्य प्रदेशात या शब्दाच्या आणि राजकीय नेत्यांभोवती चर्चा सुरू असतानाच ज्या स्रीसाठी कमलनाथ यांनी ‘आयटम’ शब्द वापरला होता त्या भाजप नेत्या इमरती देवी यांचाही एक व्हिडिओ व्हायरल झालेला दिसला. या व्हिडिओत इमरती देवी कमलनाथ यांच्या आई-बहिणीचा उद्धार करत ‘आयटम’ शब्दाचा वापर करताना दिसल्या होत्या.
निवडणूक आयोगानं भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांच्या ‘चुन्नू-मुन्नू’ टिप्पणीवरही नाराजी व्यक्त केली होती. निवडणूक आयोगानं हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय. विजयवर्गीय यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्याविरुद्ध बोलताना ही टिप्पणी केली होती. यावर निवडणूक आयोगानं विजयवर्गीय यांना समज दिली होती.