अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण खान्देशातील असंख्य भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलेश्वर येथील तीर्थ स्थळावर आज पहाटेपासूनच ऋषीपंचमी निमित्ताने पवित्र स्नान करण्यासाठी राज्यभरातून हजारो महिला भाविकांनी हजेरी लावली.
या दरम्यान श्री क्षेत्र कपिलेश्वर संस्थान च्या वतीने अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रथमच याठिकाणी ऋषीपंचमीचा हा आगळावेगळा उत्साह दिसून आला. अमळनेरच्या पश्चिमेला व अमळनेर शहरापासून २५ किमी अंतर असलेल्या श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर ची संपूर्ण खान्देशात पवित्र तीर्थस्थान व पर्यटन म्हणून आगळीवेगळी ओळख आहे.
येथील मंदिर हे हेमाडपंती व मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू महादेवाची पिंड असल्यामुळे याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी दूरवरून याठिकाणी येत असतात. अर्थातच आज ऋषीपंचमी असल्याने राज्यभरातील महिला भाविकांनी या त्रिवेणी संगमावर दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती; तर दुसरीकडे तब्बल दोन ते तीन किमी अंतरापर्यंत वाहनांचा रांगा लागल्या होत्या. यामुळे येथील तीर्थक्षेत्राला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले पहावयास मिळाले.