जळगाव प्रतिनिधी । घराचे स्टोअर रूम फोडून घरातील २० हजार रूपये किंमतीचा एल.सी.डी. टीव्ही चोरून नेल्याची घटना शहरातील कंवर नगरात उघडकीला आली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, लखमीचंद घनश्यामदास आडवाणी (वय-४०) रा. सातपुडा हौसिंग सोसायटी, गणपती नगर हे व्यावसायिक आहेत. त्यांचे शहरातील कंवरनगरात जुने घर आहे, त्या ठिकाणीकोणीही राहत नाही. घर बंद असल्याचे पाहून चोरट्याने घराचे स्टोअर रूम फोडून घरातून २० हजार रूपये किंमतीचा एल.सी.डी. टीव्ही चोरून नेल्याचे ११ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी लखमीचंद आडवाणी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास शेडे यांच्या पथकाने संशयित आरोपी संतोष माणिक सोनार (वय-२०) रा. सिंधी कॉलनी याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेडे करीत आहे.