नवी दिल्ली वृत्तसंस्था- काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावतला हिमाचल प्रदेश सरकारनं सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला असतानाच मोदी सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर गृह मंत्रालयाने तिला Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे.
मुंबईविषयी वक्तव्य करणाऱ्या कंगनावर अनेक स्तरांमधून टीका होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील कंगनाला खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळेच त्यांना प्रत्युत्तर देत कंगनाने ९ सप्टेंबरला मुंबई येणार असल्याचं ठरवलं आहे. मात्र, तिच्या वक्तव्यामुळे अनेक जण नाराज आहेत. त्यामुळे तिच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. या परिस्थितीमध्ये हिमाचल प्रदेश सरकारनेदेखील कंगनाला सुरक्षा दिली आहे.