मुंबई वृत्तसंस्था । मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना रणौतने आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. कंगना आणि शिवसेना असा वाद पेटला असतानाच बृह्नमुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. त्यावर राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कंगना व राज्यपाल कोश्यारी यांची भेट झाली.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आक्रमक टीका करणारी अभिनेत्री कंगना रणौतवर मुंबई व मुंबई पोलिसांविषयी केलेल्या विधानानंतर टीकेची झोड उठली होती. त्यावरून कंगना विरुद्ध संजय राऊत असं शाब्दिक युद्धही बघायला मिळालं होतं. त्यातच महापालिकेनं अनधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणात कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. त्यामुळे कंगना भडकली होती.
कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कंगनानं आज राज्यपालांची भेट घेतली. भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे समजू शकलं नाही. मात्र, राज्यपालांशी चर्चा करतानाचे कंगनाचे फोटो समोर आले आहेत. यावेळी कंगनाची बहीणही उपस्थित होती.