औरंगाबाद (वृत्तसंस्था) शहरातील जालना रोडवरील सेव्हन हिल उड्डाणपूलाजवळील एक बीअर बार फोडून सुमारे दिड लाखाचा माल लंपास केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.

लॉकडाउन सुरू झाल्यापासून शासनाच्या आदेशानुसार राज्यातील हॉटेल बंद आहेत. शहरातील सेव्हन हिल पुलाजवळ दिलीप सिताराम शिंदे यांच्या मालकीचे देवदास बिअर बार आहे. अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे दोन्ही शटर उचकटून आणि एक कुलूप तोडून चोरी केल्याचे आज सकाळी नजरेस पडले. चोरट्यानी १ लाख ४३ हजार ३५० रूपये किमतीचा विदेशी दारूसाठा चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याविषयी दिलीप शिंदे यांनी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. दरम्यान, शिंदे यांनी हॉटेलच्या सुरक्षेसाठी त्यांनी तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून चित्रीकरण मोबाईलवर पाहण्याची सोय केली आहे. यानुसार २४ रोजी सकाळी ते झोपेतून उठले तेंव्हा त्यांनी हॉटेलच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे चित्रण पाहिले असता चोरीचा प्रकार उघड झाला.


