सांगली प्रतिनिधी | ओबीसींच्या हितासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली मंत्रिमंडळ उपसमिती गेल्या वर्षभरापासून कागदावरच आहे. या समितीकडून ओबीसींच्या एकाही प्रश्नाची सोडवणूक झालेले नाही. त्यामुळे बेपत्ता झालेली मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची नियुक्ती करावी, अशी खोचक मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत वृथ्त असे की, राज्यातील ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ऑक्टोबर २०२० मध्ये मंत्रिमंडळ उपसमितीची निर्मिती केली. नागरी अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ या समितीचे अध्यक्ष आहेत. तर मंत्री विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, गुलाबराव पाटील, माजी मंत्री संजय राठोड, आदींचा या समितीत समावेश आहे. याच समितीवरून आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीकास्त्र सोडले आहे.
निर्मितीपासूनच उपसमिती अदृश्य असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली. गायब झालेल्या उपसमितीचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्पेशल टास्क फोर्सचे निर्मिती करावी. टास्क फोर्सच्या माध्यमातून समितीमधील मंत्र्यांचा आणि त्यांनी ओबीसींसाठी केलेल्या कामांचा शोध घ्यावा. अन्यथा ओबीसी समाजाकडून राज्यभरातील पोलीस ठाण्यांमध्ये समितीच्या शोधासाठी तक्रारी दाखल केल्या जातील, असा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे.