*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील ओढरे येथे ग्लोबल बंजारा संस्थेच्या वतीने सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.
देशभरात १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा सावट असल्याने जयंती हि घरातच साजरी करण्यात येत होती. मात्र कोरोना बाधीत रूग्णांची संख्या घसरणीवर आल्याने राज्य सरकारने सगळे कठोर निर्बंध हटविले आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील विविध भागात यंदाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यात तालुक्यातील ओढरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेच्या वतीने डाॅ.आंबेडकरांच्या जीवनावर आधारीत सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेबांचा विचार आजच्या तरूणात रूजावा यासाठी संस्थापक अध्यक्ष अशोक राठोड यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने प्रश्नावली सोडून घेतली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह मोठ्यांनीही आवर्जून सहभाग नोंदविल्याने स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या अनोख्या संकल्पनेबाबत संस्थापक अध्यक्ष अशोक राठोड यांचे भरभरून कौतुक होत आहे.