जळगाव प्रतिनिधी । ओजस आयुर्वेद आणि केरला आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मणके व सांधे दु;खी निवारण शिबीर संपन्न झाले. सदर शिबिराचा ८३ रुग्णांनी लाभ घेतला असून शिबिरात केरला आयुर्वेदातर्फे मोफत औषधींचे वाटप करण्यात आले. ओजस आयुर्वेदचे संचालक डॉ. महेश बिर्ला, केरला आयुर्वेदाचे डॉ. अरुण गोपीनाथ आहार तज्ञ सौ.अर्चना बिर्ला आणि योग तज्ज्ञ प्रा.कृणाल महाजन उपस्थित होते.
सध्या शिशिर ऋतू सुरु असून या ऋतूमध्ये संधिवात, आमवात, मणक्यांचे विकार आणि सांधे दु;खीचा त्रास वाढलेला दिसून येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात प्रत्येक १० व्यक्तींमागे ०४ व्यक्तींना संधिवात, मणक्यांचे विकार तथा तत्सम विकार जडलेले आहेत. यावर मात करण्यासाठी थंडीच्या दिवसात अशा रुग्णांना लाभ व्हावा यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार, १८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते २ यावेळेत साधारण ८३ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. भविष्यात अशा शिबिरांची आवश्यकता बघून प्रत्येक महिन्यात किमान दोन शिबीरे आयोजित करण्याचा मानस डॉ. महेश बिर्ला यांनी व्यक्त केला. तसेच ज्यांना आयुर्वेदानुसार आहाराचे नियोजन आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक होते, अशा रुग्णांना आहारतज्ञ अर्चना बिर्ला यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रुग्णांना १० दिवसांची आयुर्वेदिक औषधी मोफत देण्यात आली.
यावेळी ओजस आयुर्वेदचे डॉ. अमृता कुकरेजा, डॉ. पंकज इजारे, डॉ. रेणुका राजे, डॉ. कृष्णप्रिया आणि डॉ. स्वाती सोनावणे आदी तज्ञ डॉक्टर मंडळींनी रुग्णांची तपासणी केली. मणके व सांधे दु:खी उपयुक्त योगासनांची माहिती कृणाल महाजन यांनी दिली तर खुशी मंडोरा यांनी रुग्णांकडून योगाचा सराव करून घेतला. आदर्श के, राकेश मेटकर, रंजना कुलकर्णी, प्रशांत दीक्षित आदींचे सहकार्य सदर शिबिराला लाभले.