मुंबई : वृत्तसंस्था । ऑनलाइन गेममधून राज कुंद्राच्या कंपनीने कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते व आमदार राम कदम यांनी आज पत्रकारपरिषदेत केल्याचे समोर आले आहे.
पॉर्न फिल्म गुन्ह्यात अटक झालेल्या राज कुंद्रा समोरील अडचणी आता अधिकच वाढत असल्याचे दिसत आहे. भाजपा प्रवक्ते व आमदार राम कदम यांनी आज राज कुंद्रावर पत्रकारपरिषदेत गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे.
राम कदम म्हणाले की, राज कुंद्रा व त्यांच्या कंपनीने ऑनलाईन गेम ‘गॉड’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लुबाडले आहेत. गॅम्बलिंग गेमद्वारे पैसे उकळले आणि वितरणाच्या नावाखाली गरिबांचे पैसै लुटले असल्याचाही राम कदम यांनी राज कुंद्रावर आरोप केला आहे.
राम कदम म्हणाले, राज कुंद्राने या गेमच्या प्रचारासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं नाव व फोटोंचा वापर केला होता. राजु कुंद्राने ऑनलाईन गेम GOD च्या माध्यमातून फसवणुक केली. शिल्पा शेट्टीच्या गुणांचा आम्ही सन्मान करतो, मात्र या गेमच्या प्रचारासाठी शिल्पा शेट्टीच्या चेहऱ्याचा देखील वापर केला गेला. राज कुंद्राची विआन इंडस्ट्री नावाची कंपनी आहे, ज्यामध्ये ते संचालक आहेत. विआन कंपनीचा GOD (Game of Dots) नावचा एक खेळ आहे. हा एक लीगल ऑनलाइन गेम असल्याचं सांगितलं गेलं आहे. विआन कंपनीच्या लेटरहेडवर शिल्पा शेट्टीच्या फोटोचा प्रमोशनसाठी वापर केला जात होता. असं सांगितलं गेलं आहे की हा खेळ सरकारमान्य आहे. या खेळात बक्षीसाची रक्कम दिली जाणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. देशभरातील लोकांना लुटलं गेलं आहे. २५०० ते ३००० कोटींचा घोटाळा विआन इंडस्ट्रीने केला आहे.
राज कुंद्रा व पत्नी- अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना सेबीने बुधवारी दंड ठोठावला. उभयतांच्या विआन इंडस्ट्रीजवर समभाग गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करताना भांडवली बाजार नियामकाने ३ लाख रुपये भरण्याचा आदेश जारी केला. हिंदुस्थान सेफ्टी ग्लास इंडस्ट्रीज म्हणून ओळखले जाणाऱ्या विआन इंडस्ट्रीजचे राज व शिल्पा प्रवर्तक आहेत. १० कोटी रुपयांचे बाजार भांडवल असणारी विआन इंडस्ट्रीज भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपनी आहे. राज ऊर्फ रिपू सुदन कुंद्रा व शिल्पा शेट्टी कुंद्रा संचालक असलेल्या विआन इंडस्ट्रीजची सप्टेंबर २०१३ ते डिसेंबर २०१५ दरम्यान करण्यात आलेल्या चौकशीवर आधारित ही कारवाई करण्यात आली आहे.