ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरु

लंडन वृत्तसंस्था । ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनका विकसित करत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ब्रिटनमधील औषधे आणि आरोग्य सेवा उत्पादने नियामक प्राधिकरणाने संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर क्लिनिकल चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. लस टोचलेल्या एका स्वयंसेवकाच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे चाचणी थांबवण्यात आली होती.

ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राजेनक यांनी सांगितले की, काही सूचनांबाबतची माहिती आताच सार्वजनिक करू शकत नाही. मात्र, स्वतंत्ररीत्या झालेल्या चाचणीत ही लस सुरक्षित आढळली आहे. औषधे आणि आरोग्य सेवा उत्पादने नियामक प्राधिकरणाने केलेल्या तपासणीत लस सुरक्षित आढळल्यामुळे लशीची चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

या लशीचे पहिल्या दोन टप्प्यात चांगले परिणामही दिसून आले होते. भारतातही या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ब्रिटनमध्ये या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान एका व्यक्तीला ही लस देण्यात आली. मात्र, त्यानंतर ही व्यक्ती आजारी पडली. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कंपनीने ही लस चाचणी थांबवण्याचा निर्णय घेतला. भारतातही लस चाचणी थांबवण्यात आली. सिरम इन्स्टिट्यूटच्या देखरेखीत ही चाचणी घेण्यात येत आहे. डिसेंबर महिन्यात लशीची पहिली खेप उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Protected Content