एस.टी. महामंडळाच्या सुरक्षितता अभियानाला सुरूवात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात जळगाव एस टी महामंडळाच्या वतीने सुरक्षितता अभियानाचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 11 ते 25 जानेवारी दरम्यान जळगाव एस टी महामंडळाच्या वतीने सुरक्षितता अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महामंडळाच्या सुरक्षितता अभियानचे उद्घाटन पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून व फीत कापून करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जळगाव विभागाचे नियंत्रक भगवान जगनोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, आगार व्यवस्थापक नीलिमा बागुल, कामगार अधिकारी कमलेश भावसार, सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक जाधव, सांख्यिकी अधिकारी रवींद्र पवार, विभागीय वाहतूक अधीक्षक दिलीप बंजारा, लेखाधिकारी मिलिंद सांगळे, आस्थापना अधिकारी प्रशांत महाजन, , स्थानक प्रमुख मनोज तिवारी, इंटक जनरल सेक्रेटरी नरेंद्रसिंग राजपूत, कामगार सेना विभागीय सचिव आर के पाटील, कामगार संघटना विभागीय अध्यक्ष विनोद शितोळे, प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी 25 वर्ष विना अपघात सेवा देणाऱ्या अरुण कोळी, रवींद्र सोनवणे, लक्ष्मण नन्नवरे, मोतीलाल नन्नवरे, शरद सोनवणे दौलतराव निकम या एस. टी चालक कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एसटी चालकांना मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की त्यांचा राजकीय प्रवास हा एसटी महामंडळाच्या बसने सुरू झालेला आहे. निरंतर बसने ये जा करीत असल्यामुळे एसटी महामंडळाच्या अडीअडचणी चांगल्या प्रकारे जाणत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या खाजगी वाहनांचे प्रमाण वाढल्यामुळे एसटी चालकांना रस्त्यावर बस चालवत असताना अनेक समस्या निर्माण होत असतात तरीदेखील आजही एसटी महामंडळाचा प्रवास सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला. एसटी महामंडळाची भरभराट करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे कौतुक करत सुरक्षित वाहन चालविण्याबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार अधिकारी कमलेश भावसार यांनी केले. सूत्रसंचालन गोपाळ पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप सूर्यवंशी यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्रात उत्पन्नाच्या बाबतीत जळगाव विभागाचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जगनोर यांनी उत्पन्न वाढीचे सर्व श्रेय एसटी कर्मचाऱ्यांना समर्पित केले.

Protected Content