मुंबई वृत्तसंस्था । जळगाव आगारातील एस.टी. कंडक्टर मनोज चौधरी यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने एस.टी. महामंडळातील कर्मचार्यांना एक महिन्याच्या वेतनासह बोनस तातडीने देण्याची घोषणा केली आहे.
एसटी कर्मचार्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली, जळगावात वाहक म्हणून कार्यरत असलेले एसटी मनोज चौधरी यांच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून त्यात मराठी माणसांचे ठाकरे सरकार हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून एस.टी. महामंडळाच्या कर्मचार्यांची आर्थिक दुरवस्था समोर आलेली आहे. तर यावरून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टिका देखील होऊ लागली आहे.
दरम्यान, या प्रकरणी राज्यभरातील एस.टी. कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेण्याची तयारी दर्शविल्याचेही दिसून आले आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने कर्मचार्यांना एक महिन्याचे वेतन आणि सोबत दिवाळीचा बोनस देण्याची घोषणा केली आहे.
एसटी कर्मचार्यांचा गेल्या तीन महिन्यांचा पगार थकलेला आहे. त्यापैकी दोन महिन्यांचा पगार देण्यात येणार आहे. या महिन्याचा पगार तासाभरात केला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी आणखी एका महिन्याचा पगार कर्मचार्यांना दिला जाईल. दिवाळी बोनसही दिला जाईल. एसटी कर्मचार्यांनी हे तात्पुरते संकट आहे, टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन परब यांनी केले आहे.