जळगाव प्रतिनिधी । चाळीसगावातून दोन दुचाकी चोरणार्या चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
अनिल उर्फ अमित राजेंद्र सैंदाणे (वय २९, रा. शास्त्रीनगर, चाळीसगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. अनिल याने रविवारी सायंकाळी ६ ते ७.३० वाजता शहरातील डॉ. परदेशी हॉस्पिटलसमोरून कैलास जगन पारधी (वय ४५, रा. डोणदिगर, ता. चाळीसगाव) यांची तर रेल्वेस्थानक परिसरातून श्रीकांत विठ्ठल ठुबे (रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव) यांची दुचाकी चोरली होती.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर विजयसिंग पाटील, अनिल जाधव, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख, राहुल पाटील, दीपक चौधरी यांच्या पथकाने अनिल सैंदाणे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरीच्या दोन्ही दुचाकी काढून दिल्या. पुढील तपासासाठी त्याला चाळीसगाव शहर पोलिस स्थानकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.