जळगाव प्रतिनिधी। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश रात्री उशिरा प्राप्त झाले असून लाईव्ह ट्रेंडस न्यूजने याआधी दिलेल्या वृत्ताला शिक्कामोर्तब झाले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून बापू रोहम यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदावरून बदली होण्याची चर्चा पोलीस प्रशासनात सुरू होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बदलीचे आदेश काढले आहे. रोहम यांची बदली आता नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.
महिनाभरापूर्वी चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील लाखोंच्या गुटखा प्रकरणात यापूर्वीच पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या ७ पोलिस कर्मचार्यांसह मेहुणबारे येथील सहायक पोलिस निरीक्षक यांना निलंबित केले आहे. याच गुटखा प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांची उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी पोलिस निरीक्षकपदी किरणकुमार भगवानराव बकाले यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.