जळगाव प्रतिनिधी । केंद्र व राज्य शासनाकडून शहरातील एलईडी योजनेचे काम मंजूर झाल्यापासून दीड वर्षात देखील पूर्ण न झाल्याने ही योजना रद्द करण्याची मागणी शिवसेना सदस्यांनी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केली. सदरील योजना ही महत्वाची असल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनामुळे ही योजना रखडल्याचे सांगत स्थायी सभापती ॲड. सुचिता हाडा यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ॲड. शुचिता हाडा यांची सभापती म्हणून आजची सभा शेवटची सभा होती.
या विषयांना मिळाली मंजुरी
आज बुधवारी महापालिकेत स्थायी समितीची सभा सभापती ॲड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांची सभापती म्हणून बुधवारची सभा शेवटची असल्याने सत्ताधारी भाजपच्या सदस्यांसह शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील ॲड. हाडा यांच्या अकरा महिन्यांचा कामाकाजाबाबत कौतुक केले.
दुर्लक्षामुळे चांगली योजना वाया जाण्याच्या तयारीत
आमदार चंदूलाल पटेल यांच्या निधीतून शहरातील विविध भागात 30 सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याचा प्रस्तावाला मंजूरी, मलेरिया, चिकून गुनीया अशा साथ रोग नियंत्रणसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी 150 कर्मचारी पुरविण्यासाठी 70 लाख रुपयांच्या निविदेला मंजुरी. शहरात सोलर स्ट्रीट लाईट बसविण्यात येणार असले तरी याआधी बसविण्यात आलेल्या एलईडीच्या मुद्द्यावर सभेत चांगलीच चर्चा झाली. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील एलईडी बसविण्याची योजना वाया गेली असल्याचा आरोप नितीन लढ्ढा यांनी केला. तसेच त्यापैकी बरेच लाईट खराब झाले असून आता ते लाईट काढून ट्यूबलाईट बसविले जात असल्याचा आरोप माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी केला. शासनाने आणलेली ही योजना चांगली होती. मात्र, मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चांगली योजना वाया जाण्याच्या तयारीत असल्याचा ठपका ॲड. शुचिता हाडा यांनी प्रशासनावर ठेवला.