मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – संसर्ग प्रादुर्भाव नियमांत शिथिलता देण्यात आल्यानंतर राज्यासह देशात शाळा, महाविद्यालये पूर्ववत सुरू झाली आहेत. त्यामुळे विविध संस्थाच्या परीक्षा देखील एकाचवेळी आल्या आहेत. त्यामुळे एमएचटी सीईटी परीक्षा लांबणीवर पडली असल्याचे तंत्र शिक्षणमंत्री ना.उदय सामंत यांनी म्हटले आहे.
राज्यासह देशात गेल्या पाच सात महिन्यापासून शाळा महाविद्यालये पूर्ववत सुरु होऊन विविध परीक्षांच्या वेळा देखील एकाच वेळी आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यातच जेईई आणि एनईईटी या दोन परीक्षा एकाच वेळी होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासन आयोजित कॉमन एन्ट्रान्स टेस्ट अर्थातच एमएचटी–सीईटी परीक्षा लांबणीवर पडली आहे.
एमएचटी सीईटी २०२२ ही परीक्षा ११ जून ते १६ जून दरम्यान घेण्यात येणार होती. त्याचवेळी जूनमध्ये जेईई मेन २०२२ ही परीक्षा देखील घेण्यात येणार आहे. शिवाय १७ जुलैपासून एनईईटी ही परीक्षा देखील होणार आहे. या दोन्ही परीक्षामुळे एमएचटी सीईटी परीक्षा लांबणीवर पडली आहे. एनईईटी परीक्षा पार पडल्यानंतर एमएचटी सीईटी परीक्षा घेण्यात येतील. यासंदर्भात परीक्षेच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आल्या नसल्या तरी लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे.संबंधित परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असून, परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असे संकेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.