जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील एच.डी.प्रोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये संरक्षक भिंतीच्या खाली खड्डा खोदून प्रवेश करून दीड लाख रूपयांचे साहित्य चोरून नेणाऱ्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी मंगळवार ९ मे रोजी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, एच.डी.प्रोटेक्ट कंपनीतून १ लाख ३२ हजार ३०० रूपये किंमतीचे मिडल एल्बो कास्टींग आणि १३ हजार रूपये किंमतीचे एनगॉट ब्राँझ धातूच्या दोन पट्टया गायब झाल्याचे घटना बुधवारी ३ मे रोजी सकाळी उघडकीला आली होती. याप्रकरणी कंपनीचे वरीष्ठ व्यवस्थापक मोहन बलवंत कुळकर्णी गुरूवारी ४ मे रेाजी दुपारी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली. दरम्यान, कंपनीत कंत्राटी पध्दतीने काम करणारा देवानंद उर्फ देवा गोकूळ कोळी (वय-३२) रा. कुसुंबा ता.जि. जळगाव याने साथीदार विक्की आत्माराम कोळी (वय-३२) रा. सावदा ता. रावेर ह.मु. रामेश्वर कॉलनी, जळगाव आणि ईश्वर श्रावण महाजन (वय-३४) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्या मदतीने चोरी केल्याचे समोर आले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, किरण पाटील, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, ललीत नारखेडे अशा पथकाने मंगळवारी ९ मे रोजी सापळा रचून तिघांना अटक केली. तिघांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. संशयित आरोपींना न्यायमुर्ती श्रीमती जे.एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता तिघांना १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.