जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरात असलेल्या गीता इंडस्ट्रीज कंपनीतून इलेक्ट्रिक सर्व्हिस वायरचे बंडल आणि अल्युमिनियम कॉईल असा एकूण ५९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी २५ जुलै रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी सेक्टर मधील ३२ मध्ये असलेल्या गीता इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीत इलेक्ट्रिक वायर बनवण्याचे काम होते. दरम्यान १९ जुलै मध्यरात्री कंपनी बंद असतांना संशयित आरोपी संतोष मोहन चव्हाण रा. सुप्रीम कॉलनी याने कंपनीचे शटरचे लॉक तोडून कंपनीतून ५९ हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे कॉइल आणि सर्व्हिस वायरचे बंडल असा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे मालक राहुल प्रताप गुरुनानी रा. गायत्री नगर, शिरसोली रोड जळगाव यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी संतोष मोहन चव्हाण रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.