नवी दिल्ली : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे ,असं ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल-मुस्लमीन (एमआयएम) प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितलं आहे. .
पक्षाने उमेदवारांच्या निवड प्रक्रियेस सुरूवात केली आहे. आम्ही ओम प्रकाश राजभर यांच्या भागीदारी संकल्प मोर्चाशी आघाडी केली आहे, अन्य कुणाशी नाही.” असेही ते म्हणाले
उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. आजच बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी स्वबळचा नारा देत, एमआयएम सोबतच्या आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता एमआयएम कडून देखील या निवडणुकीच्या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार असल्याचं मायावतींनी या अगोदर जाहीर केलं आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपा व एमआयएम यांच्या आघाडी होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या, त्यावर देखील मायावतींनी भूमिका स्पष्ट केली आहे. बसपा व एमआयएम यांच्यातील आघाडीबाबतच्या चर्चा संपूर्णपणे चुकीच्या आहेत, यामध्ये काहीच तथ्य नाही. असं मायावतींनी सांगितलं आहे.
पंजाब सोडून उत्तर प्रदेश व उत्तराखंड मधील पुढील वर्षी सुरू होणाऱ्या विधानसभेची निवडणूक बीएसपी कोणत्याही पक्षाशी आघाडी करून लढणार नाही, म्हणजे, स्वबळावरच निवडणूक लढवणार, असं मायावतींनी आज ट्विटद्वारे सांगितलं आहे.