मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | एनएसएस शिबिर म्हणजे सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन उप प्राचार्य अनिल पाटील यांनी केले. ते श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयात आयोजित विशेष हिवाळी शिबिरात बोलत होते.
मुक्ताईनगर येथील श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष हिवाळी शिबिर पूर्वतयारी कार्यक्रम हे आधुनिक शेती व नवीन तंत्रज्ञानाचे उपयोजन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन, एनएसएस शिबिराची पूर्वतयारीचे मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील तर शेती विषयक कार्यशाळेचे मार्गदर्शक प्रा. डी. एस. कोल्हे (बायोटेक्नॉलॉजी विभाग) उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर दिनांक २१ ते २७ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत दत्तक गाव हरताळे येथे संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने प्रमुख मार्गदर्शक डॉ.पाटील यांनी एन एस एस शिबिर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्रबिंदू असते कारण या शिबिरामध्ये श्रमदान, बौद्धिक सत्र, सांस्कृतिक कलामंच सत्र आणि इतर समाज उपयोगी जनजागृती कार्यक्रम नियोजित असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास होत असल्याने सर्वांगीण विकास साधला जात असतो. प्रा. डी.एस.कोल्हे यांनी शेती विषयक मार्गदर्शन कार्यशाळेत आधुनिक शेती तंत्रज्ञानात रासायनिक खतापेक्षा जैविक खताचा वापर करणे गरजेचे असून त्यामुळे मातीचे संवर्धन व संधारण होऊन देशाच्या कृषी व्यवस्थेचा शाश्वत विकास होईल असा मौलिक संदेश विद्यार्थ्यांना दिला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य महाजन यांनी अध्यक्षीय भाषणात शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधला पाहिजे असे आवाहन केले. तसेच भारत देश हा कृषिप्रधान देश असल्याने आधुनिक शेतीत विविध तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे म्हणून शेती विषयक कार्यशाळेचे आयोजन देशाच्या कृषी व्यवस्थेला दिशादर्शक ठरेल अशी आशा व्यक्त केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. संजीव साळवे आणि प्रा. डॉ. प्रतिभा ढाके यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हजेरी लावली.यामध्ये संदेश दुट्टे कुणाल भारंबे, तेजस सरोदे, कमलेश जावरे, प्रफुल यमनेरे, ऋषिकेश वानखेडे निकिता कपले, गायत्री दुट्टे , ऋत्विक बढे, पूनम सोनार, निखिल भोजने, निखिल रायपुरे, शुभम गायकवाड, ऋषिकेश चौधरी, प्रतीमा मोरे व रेणुका काकडे इत्यादी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन एस एस कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. दीपक बावस्कर यांनी प्रास्ताविक प्रा. विजय डांगे तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. छाया ठिंगळे यांनी केले.