सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) हे दोन वेगळे विषय आहेत. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हा तिसरा विषय आहे. सीएए लागू झाला तरी आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. एनआरसी हा आलेला नाही, तो येणारही नाही. कारण, एनआरसी लागू केला तर मुस्लिमांनाच नव्हे तर, हिंदू, आदिवासी आणि इतर वंचितांनाही तो त्रासदायक ठरेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओरोस येथे शिवसैनिकांच्या मेळाव्यात म्हणाले.
नागरिकत्व दुरुस्ती कायदाला (सीएए) राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा विरोध असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र, ‘या कायद्याला आपला विरोध नाही’, याचा ठाम पुनरुच्चार केला आहे. मंगळवारी सिंधुदुर्ग दौऱ्यात ओरोस येथे त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. एनपीआर ही जनगणना आहे. ती दर दहा वर्षांनी होते आणि त्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही, असे मला वाटते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.