जळगाव प्रतिनिधी । एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याच्या नावाखाली छेडछाड करुन ५ लाख ६३ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, कंपनीचे व्यवस्थापक महेंद्र पांडूरंग जोंबाडे यांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, सीएमएस इन्फो सिस्टीम्स लि.या कंपनीमार्फत जिल्ह्यातील वेगवेगळ्या बॅँकेचे एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम केले जाते. शिव कॉलनी थांब्याजवळील टाटा इंडीकॅश हे एटीएम मशीन लावण्यात आले आहे. या एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा कंपनीच्या कॉल सेंटरकडून दिनेश पाटील याला सोमवारी दुपारी तीन वाजता संदेश आला. दिनेश प्रकाश पाटील (लक्ष्मी नगर), राहूल संजय पाटील (रा.खडके बु.ता.एरंडोल ) दोघंही कंपनीच्याच कामासाठी एरंडोल येथे असल्याने मुकेश विलास शिंदे (रा.समता नगर) याने कंपनीचे कस्टोडीयन मुकेश शिंदे याला सायंकाळी साडे सहा वाजता तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी पाठविले. दिनेश याने कंपनीचा गोपनीय १६ अंकी पासवर्ड शिंदे याला सांगितला. त्यानंतर शिंदे याने हा बिघाड दूर केला. त्यानंतर रक्कम गायब झाली. या प्रकरणी एटीएमचे काम पाहणाऱ्या व्ववस्थापकाच्या तक्रारीवरुन कंपनीचे कस्टोडीयन संशयित आरोपी दिनेश, राहुल व मुकेश या तिघांविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.