एकलव्य संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलनांचा इशारा

पाचोरा, प्रतिनिधी  ।  एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या अध्यक्षतेखाली  पाचोरा तालुका कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आदिवासी भिल्ल समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात येऊन घरकुलासाठी जागा उपलब्ध न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.  

 

पाचोरा तालुक्यातील भिल्ल समाज बांधवाची सर्वात मोठी समस्या ही शबरी घरकूल योजनेच्या बाबतीत आहे.  जागा नावे नसल्या कारणांमुळे योजनेचा लाभ घेता येत नसल्याचा प्रश्न बैठकी उपस्थित करण्यात आला.  यावर जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांनी सांगितले की, असा कुठल्याही नियम नाही. शासनातर्फे काढण्यात आलेल्या जी.आर.नुसार लाभार्थी जर ग्रामपंचायतच्या जागेवर राहात असेल व ती जागा त्यांच्या नावे नसेल तरी त्याला त्याच जागेवर घरकुलचा लाभ त्यास मिळायला हवा. मग ते शबरी घरकुल योजना असो की प्रधानमंत्री घरकुल योजना असो जर का ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी हे प्रश्न सोडवत नसतील  तर संघटनेच्या माध्यमातून लवकरच पाचोरा तालुक्यात आंदोलन ह्या संदर्भात करावे लागणार असल्याचे ही चर्चेत सांगण्यात आले. तसेच विविध प्रकारच्या समस्या बैठकीत मांडण्यात आल्या रेशनकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, दफनभूमी ह्या सर्व समस्या जिल्हाध्यक्ष यांच्या समोर मांडण्यात आल्या. यावेळी बैठकीला एकलव्य संघटना युवा जिल्हाध्यक्ष रवि सोनवणे, पाचोरा तालुकाध्यक्ष गणेश वाघ, भडगाव तालुकाध्यक्ष संजु सोनवणे, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, पाचोरा उपाध्यक्ष दादाभाऊ भिल्ल, विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष कैलास सोनवणे, गणेश नाईक, भगवान मोरे, सुनिल सोनवणे, आकाश भिल व पाचोरा तालुक्यातील भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content