मुंबई (वृत्तसंस्था) यापूर्वीही इच्छुकांना तिकीट नाकारल्यानंतर एकनाथ खडसेंनी अनेकांची समजूत काढली आहे, त्यामुळे ते आता स्वतःही समजून घेतील’, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
येत्या 21 मे ला विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक होणार आहे. भाजपने विधानपरिषदेच्या चार जागांसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांची नावे जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, उमेदवारी घोषित झाल्यानंतर चारही जणांनी आज अर्ज भरले आहेत. भाजपमधील इच्छुकांची नावे आम्ही केंद्राकडे पाठवली होती. दिल्लीत उमेदवार पार्शवभूमी सांगितली जाते. त्यामुळे उमेदवारीबाबत केंद्राने घेतलेला हा निर्णय आहे. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा ताई यांच्याबद्दल केंद्राने काहीतरी विचार केला असेल. हे सगळे इतके चांगले कार्यकर्ते आहेत. हे तिघेही समजूतदार आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.