जळगाव प्रतिनिधी । एकतर्फी प्रेमातून तरूणीला ब्लॅकमेल करणार्याने गुन्हा दाखल होण्याची शक्यता दिसताच पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्येचा केलेला प्रयत्न पोलिसांचा सतर्कतेने टळला आहे. ही थरारक घटना शहरातील रामानंद नगर पोलीस स्थानकात घडली.
या घटनेबाबत सूत्रांची माहिती अशी की, यावल तालुक्यातील तरुण व तरुणी फैजपूर येथील महाविद्यालयात सोबत शिक्षण घेत होते. या काळात या तरुण व तरुणीची ओळख झाली होती. सुमारे चार महिन्यांपूर्वी या तरुणीचे लग्न झाल्यानंतर त्याने एकतर्फी प्रेमातून तरुणीला काही दिवसापासून त्रास द्यायला सुरु केला आहे. तिला तसेच तिच्या पती व दिराला फोन करुन खोटीनाटी माहिती दिली. त्याने अजून दोन जणांसोबत कॉलेजातील फोटो तरुणीच्या सासरच्या मंडळीकडे पाठविल्यानंतर या तरुणीच्या कुटुंबात वाद निर्माण झाला. त्यामुळे या तरुणीने संबंधित तरुण व त्याच्या दोन्ही मित्रांच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
दरम्यान, आज या अर्जावरुन रामानंद नगर पोलिसांनी या तरुणाला चौकशीसाठी बोलावले होते. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी त्यांच्या दालनात या तरुणाची चौकशी केली. यावेळी त्याला आपल्यावर गुन्हा दाखल होण्याची माहिती मिळताच तो अस्वस्थ झाला. यानंतर निरिक्षक बडगुजर यांच्या दालनाच्या बाहेर निघताच त्याने खिशातून जंतुनाशक औषधाची बाटली काढली आणि त्याच्यातील औषध प्राशन केले. यानंतर त्याला लगेच उलट्या होऊ लागल्या. बडगुजर यांनी त्याला तातडीने देवकर आयुर्वेदीक रुग्णालयात रवाना करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे कळते.
या प्रकारामुळे बराच वेळ गोंधळाचे वातावरण होते. पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रसंगावधान राखून त्या तरूणाला तातडीने रूग्णालयात दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला आहे.