मुंबई, वृत्तसंस्था | बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी दिल्लीमध्ये चित्रीकरण करत असताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु उपचार केल्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयातून सूटी देण्यात आली. त्यानंतर ते मुंबईत परतले आणि मुंबईत परतताच त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ताप येत असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती कपूर कुटुंबियांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने दिली. सोमवारी ऋषी कपूर यांच्या भाच्याचा विवाह सोहळा पार पडला. त्यावेळी ऋषी कपूर दिसले नाही. शिवाय मंगळवारी झालेल्या रिसेप्शन पार्टीत देखील ऋषी कपूर दिसले नाहीत. त्यावेळी त्यांचा मुलगा रणबीर आणि त्यांची पत्नी नितू कपूर उपस्थित होते.