फैजपूर, प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या लासुर येथील नटेश्वर तीर्थ क्षेत्रावर आधारित पंकज महाजन लिखित “नटराज अवतार व श्री अगस्ती महाराज समाधी कथा” या ग्रंथाचे प्रकाशन सतपंथ मंदिर संस्थान येथे महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या पावन कर कमला द्वारे ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर करण्यात आले.
सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी प्रभू शिवांनी राम काळात म्हणजेच त्रेतायुगात घेतलेला नटराज अवताराची तसेच आपल्या निवासाने दक्षिण भारताला (दक्षिण भारत हा गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार या राज्यां पासून ते पार तामिळनाडू रामेश्वरम पर्यंत आहे.) पावन करणारे परोपकारी ऋषी महर्षी अगस्ती महाराजांचे दक्षिण भारतात मोठमोठी भव्यदिव्य आश्रम आहेत. त्यांची समाधी आपल्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील लासूर गावापासून दोन किलोमीटर वर सातपुड्याच्या कुशीत आहे.
ही महत्त्वाची माहिती संपूर्ण भारतातील कलाकार मंडळी तसेच प्रदोष व्रत करणारे नटराज व श्री अगस्ती महर्षींच्या भक्तांना प्रकट करणारा “नटराज अवतार व श्री महर्षी अगस्ती महाराज समाधी कथा” हा ग्रंथ शिवसुत पंकज आधार महाजन करवी प्रभू भोलेनाथांनी आपली कृपा करून प्राकृत भाषेत लिहून घेतल्याबद्दल महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी लेखक पंकज महाजन यांचे कौतुक करून पुढे असेच कार्य सुरू ठेवण्यासाठी आशिर्वाद दिले.
तसेच याठिकाणी श्रीराजगुरु श्रीवास्तव स्वामींनी राम जन्माच्या अगोदर राम कृपा व दर्शन हेतूने हजारो वर्ष तपश्चर्या केली होती. त्यांनी व श्री रामदास स्वामी यांच्या दर्शनाने हा ग्रंथ माझ्या हातून लिहिला गेला असे पंकज महाजन यांनी मनोगतात सांगितले.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून या छोटेखानी प्रकाशन सोहळ्याला लासुर येथील श्री सुरेशनाथ महाराज, आकाश फडे, सरपंच किशोर सुखदेव माळी, तंटामुक्ती अध्यक्ष व मुख्याध्यापक ए. के. गंभीर, उपाध्यक्ष उपेंद्र साहेबराव पाटील, लासुर राम मंदिर संस्थानचे गादीपती रमेश महाजन तसेच श्री मोहन अंबिकाप्रसाद तिवारी (ग्राहक संरक्षक कक्ष सदस्य), निरंजन भालचंद्र चौधरी ( हिंदू विधीज्ञ परिषद सदस्य) ,अविनाश सुभाष शिंपी ( बजरंग दल महानगर कार्यकारणी सदस्य), राजेंद्र देविदास नंनवरे( महानगर धर्म प्रसार प्रमुख), जळगाव समाज सेवक अशोकदादा लाड वंजारी, भिकन देवराम महाजन, दीपक महाजन, धर्मेंद्र महाजन आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन उपेंद्र पाटील तर उपस्थितांचे आभार निरंजन चौधरी यांनी मानले. भाविक भक्तांनी शिव रामाच्या प्रेमाचे प्रतीक नटेश्वर तीर्थक्षेत्री जाऊन सर्व दोष दूर करणारे व सर्व सुख देणारे नटराज स्वामी व सर्वश्रेष्ठ महानतम ऋषी अगस्ती महाराजांची कृपा प्राप्त करावी असे लासुरकरांनी आवाहन केले.