पंढरपूर : वृत्तसंस्था । “देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही” असे सांगत आज उमेदवार देण्याच्या भाजपच्या भूमिकेवर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोघेही आज पंढरपुरात उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा तनपुरे मठात मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेळाव्याला संबोधित केलं.
एखाद्या कामासाठी किती चिकाटी असावी हे भारत भालके यांच्याकडून पाहायला मिळालं. आमचं अस झालं..गड आला पण सिंह गेला. कारखान्यांचे प्रश्न मार्गी लागले पण नाना राहिले नाही. 35 गावांच्या पिण्याचा पाण्यासाठी त्यांनी खूप आग्रह धरला. प्रसंगी आमच्यासमोर अधिकाऱ्यांना दमदाटी केली. नानांचा विचार पुढे नेण्यासाठी शरद पवार यांनी भगीरथ भालकेंना संधी दिली, असं जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथांना आशीर्वाद आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी आली आहे, भाजपचा कुठेही विजय झालेला नाही. सगळे एकत्र आल्यावर भाजपचा पराभव होतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच काहींनी भाजपची उमेदवारी घेतली नाही. फडणवीसांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
चंद्रकांत पाटील म्हणतात आम्ही शेतकाऱ्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढवतोय. वारे रे वा. कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु असताना तुम्ही शेतकऱ्यांचं हित करणार म्हणता? असा सवाल जयंत पाटलांनी विचारला.
पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे.