वाशिम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकवर भरधाव वेगाने येणारी खासगी ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिल्याने ४ प्रवासी जागीच ठार झाले तर १२ जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मालेगाव-मेहकर रस्त्यावर सोमवारी ८ मे रोजी रात्री १० वाजता घडली आहे. या अपघातात अपघातात बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला. तर ट्रकचीही मोडतोड झाली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस (पीवाय-०५ ई १९५८) क्रमांकाची एक प्रवासी बस सोमवार ८ मे रोजी रात्री मालेगावमार्गे पुणेकडे जात होती. मार्गातील वडपनजिक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या आरजे ४७, जीए १८५० क्रमांकाच्य ट्रकवर ही बस धडकली. या भीषण अपघातात बसमधील चार प्रवासी ठार झाले, तर १२ जण गंभीर जखमी झाले. मंगेश शेषराव तिके (२५ वर्षे) रा. वाघजाळी जि. वाशिम, अक्षय प्रभु चव्हाण (२३ वर्षे) रा. साखरा जि. यवतमाळ, दिपक सुरेश शेवाळे (२७ वर्षे) रा. गणेशपुर केनवड जि वाशिम आणि अजय भारत शेलकर (२३ वर्षे) रा. कडसा जि. यवतमाळ, अशी मृतकांची, तर सुशिला राठोड (२५ वर्षे), रवि राठोड (३२ वर्षे), संदेश चव्हाण (२० वर्षे), स्वाती राठोड (०७ वर्षे) सर्व रा. वडगाव जि. यवतमाळ, देविदास आडे (४० वर्षे) रा. पन्हाळा जि. यवतमाळ, रविंद्र गुंजकर (३९ वर्षे), भिमराव वाकुडे (६५ वर्षे) दोघेही रा. केनवड जि. वाशिम, अमोल मनोहर (२९ वर्षे), संजय राठोड (४० वर्षे), विठ्ठल राठोड (४५ वर्षे) सर्व रा. यवतमाळ, रामचरण राऊत (६४ वर्षे) रा. महागाव जि. यवतमाळ आणि विठ्ठल केनवडकर (३६ वर्षे), अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती १०८ क्रमांकावर मिळताच अवघ्या काही मिनिटांत १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि रुग्णवाहिक चालक राहुल सांगळे आणि डॉ. हेमंत जोरेवार यांनी सर्व जखमींना तातडीने मालेगाव रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.