फैजपूर, प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत असे आदेश पारित केले आहेत. या आदेशानुसार फैजपूर येथील मंगल कार्यालयात लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास मंगल कार्यालय चालकांवर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मुख्यधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.
चार महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा कोरोना संसर्गाने डोके वर काढू लागले असल्याने प्रशासन हतबल झाले आहेत. यातच अंतयात्रा व लग्न समारंभात हजारो नागरिक एकत्र येऊन संसर्गाचा धोका निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा लग्न समारंभ व अंत्यविधीमध्ये नियमावली जाहीर केली आहे. यातच सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे सॅनिटायझरचा वापर करणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मंगल कार्यालय चालकांनी लग्न समारंभ तारीख बुक करतांना फक्त ५० नागरिकांनाच परवानगी द्यावी असे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केलेले आहे.
फैजपूर शहरात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून पालिका प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे. यातच शहरातील सर्व मंगल कार्यालय यांना आधीच नोटिसा बजावण्यात आलेले आहेत. लग्नसमारंभात परवानगी देताना फक्त ५० नागरिकांनाच परवानगी देण्यात यावी अन्यथा मंगल कार्यालय चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिले आहे. ज्या ठिकाणी लग्न समारंभ असतील त्या ठिकाणी पालिकेचे पथक शहरात फिरणार आहेत ५० व्यक्ती पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास त्यांच्यावर प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे व मंगल कार्यालय चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली.