रावेर, प्रतिनिधी । तहसील कार्यालय व पोलीस विभागातर्फे शासकीय सार्वजनिक बैठक व कार्यक्रमांचे आयोजन करताना या कार्यक्रमांचे नियोजन व संचालन विभागातीलच कर्मचाऱ्यांकडे देण्यात यावे. उपऱ्यांच्या हाती हे नियोजन सोपविण्यात आल्याने आम्हाला डावलले जात असल्याचा आरोप करत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महाजन यांनी प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांच्या समोर नाराजी व्यक्त करत निवेदन सादर केले.
शांतता समितीच्या बैठकीसह विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नेहमी डावलले जात असल्याची तक्रार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन काँग्रेसतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.
शांतता समिती व इतर सार्वजनिक शासकीय बैठका तसेच कार्यक्रमांवेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येत नाही. राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी असून रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार काँग्रेस पक्षाचे असतांना शासकीय बैठकांवेळी या प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना डावलले जाते अशी तक्रार तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन , योगेश गजरे, माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, सूर्यभान चौधरी, गोंडू महाजन, पंकज पाटील, संतोष पाटील, आर. एस. लहासे यांनी येथील प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्याकडे केली आहे.