उपचार करणाऱ्या ३ डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्याला दुसऱ्यांदा कोरोना

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना विषाणूच्या प्रसारानं राज्याची स्थिती गंभीर बनली आहे. विशेषतः मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरातील कोरोनाचे थैमान अजूनही थांबलेलं नाही. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगानं वाढ होत असून, मुंबई व महाराष्ट्राच्या काळजीत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत संसर्गातून बऱ्या झालेल्या आरोग्य सेवेतील ३ डॉक्टरांसह एक कर्मचारी अशा चौघांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. प्रसिद्ध लॅन्सेट जर्नलमध्ये याचा अहवाल प्रकाशित झाला आहे. अहवालानुसार चारही जणांमध्ये संक्रमणाची तीव्रती पूर्वीपेक्षा अधिक आहे.

दुसऱ्यांदा कोरोना झालेल्या रुग्णांपैकी तीन जण डॉक्टर आहेत. हे तिन्ही डॉक्टर बृह्नमुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. एक आरोग्य कर्मचारी हिंदुजा रुग्णालयातील आहे. हा अभ्यास इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अॅण्ड इंट्रिग्रेटिव बॉयलॉजी आणि दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अॅण्ड बॉयोटेक्नॉलॉजी या दोन्ही संस्थांनी केली आहे.

नायर रुग्णालयाच्या डॉ. जयंती शास्त्री व ‘आयसीजीबी’च्या डॉ. सुजाता सुनील यांनी या अभ्यासावर भाष्य केलं आहे. आरोग्य सेवेत कार्यरत असलेले चौघांनाही दुसऱ्यांदा लागण झाली आहे. पूर्वीच्या संसर्गाच्या तुलनेत दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यानंतर चौघांनाही अधिक गंभीर लक्षण दिसून आली आणि त्यांची प्रकृतीही नाजूक बनली होती.

डॉक्टरांसह आरोग्य कर्मचारी सातत्यानं रुग्णांच्या संपर्कात राहत असल्यानं त्यांना दुसऱ्यांदा कोरोना होण्याचा धोका अधिक आहे. डॉ. सुनील म्हणाले, एका आरटी-पीसीआर चाचणीतून दुसऱ्यांदा करोना झाल्याचं निश्चितपणे निदान होऊ शकत नाही. संपूर्ण जिनोम सिक्वेसिंगमधूनच पुन्हा संसर्ग झाला आहे की नाही यांचं निदान केलं जाऊ शकतं. पहिल्यांदा संसर्ग झाल्यानंतर रुग्णाला लक्षण दिसत नाही, वा कमी प्रमाणात दिसतात. मात्र, जेव्हा दुसऱ्यांदा करोना होतो, तेव्हा रुग्णांची परिस्थिती गंभीर बनते.

दुसऱ्यांदा करोना झालेल्या या चारही रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं, महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यानंतर या चौघांनाही श्वास घेण्याचा त्रास जाणवला नाही. या चौघांचंही वय कमी असल्यानं हे झालं असावं. सुरूवातीच्या टप्प्यात करोनाचा प्रसार जगभरात झाल्यानंतर दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याच्या केस कुठेही दिसून आल्या नव्हत्या. मात्र, आता हळूहळू जगभरात दुसऱ्यांदा करोना होत असल्याची प्रकरणं आढळून येऊ लागली आहे.

सप्टेंबरच्या सुरूवातीलाच हाँगकाँगमध्ये पहिल्यांदा दुसऱ्यांदा कोरोना झाल्याची केस आढळून आली होती. त्यानंतर हळूहळू इतर देशातही दुसऱ्यांदा करोना झाल्याची प्रकरणं समोर आली. बंगळुरूमध्येही फोर्टिस रुग्णालयानं एका रुग्णाला दुसऱ्यांदा कोरोना झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती.

Protected Content