उद्या विद्यापीठात आव्हान २०२२ शिबिराचा होणार शुभारंभ

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यू प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्या सोमवार दिनांक १९ डिसेंबर पासून राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ होत असून महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी हे दूरदृश्य प्रणाली (ऑनलाईन) व्दारे उदघाटन करणार आहेत. दहा दिवस हे प्रशिक्षण शिबीर चालणार असून त्यासाठी विद्यापीठ परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 

या प्रशिक्षण शिबिरात राज्याच्या २३ विद्यापीठामधील ९६८ रासेयो स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. यामध्ये ५६३ विद्यार्थी, ४०५ विद्यार्थिनी तसेच ३९ पुरूष संघ व्यवस्थापक, २६ महिला व्यवस्थापक सहभागी होणार आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात उदघाटन समारंभ होणार आहे. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी हे अध्यक्षस्थानी राहणार असून ते ऑनलाईन प्रणालीव्दारे विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतील यावेळी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील.  दि. २८ डिसेंबरपर्यंत हे प्रशिक्षण सूरू राहणार असून नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) तज्ज्ञ देणार आहेत. या शिबिराची जय्यत तयारी विद्यापीठात झाली आहे. आव्हान २०२२ चा बलून विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर उभारण्यात आला आहे. ठिकठिकाणी ध्वज लावण्यात आले आहेत. पदवीप्रदान सभागृहात उदघाटन समारंभासाठी १५०० जणांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

रविवारी सकाळपासून विविध विद्यापीठांचे संघ दाखल होऊ लागले आहेत. विद्यापीठाच्या एपीजे अब्दुल कलाम भवनाजवळ नोंदणी कक्ष उभारण्यात आला असून त्या ठिकाणी तीन काऊंटर उभारण्यात आले आहेत. यापूर्वीच संघाची ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली आहे. काऊंटरवर कार्यक्रम अधिका-यांकडून नोंदणी अर्ज व घोषणापत्र जमा करणे, स्वाक्षरीसाठी नोंदणीपत्रक देणे,  किट घेणे या प्रकारची कामे अवघ्या काही मिनिटात या नोंदणी कक्षाकडून केले जात आहेत.  मुलांच्या वसतिगृहामध्ये पुरूष रासेयो स्वयंसेवकांची व पुरूष संघ व्यवस्थापकांची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे तर मुलींच्या तीन वसतिगृहामध्ये सहभागी विद्यार्थिनींची व्यवस्था केली आहे. गरम पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. परगावाहून बस व रेल्वेने येणा-या संघांसाठी तेथून विद्यापीठात येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नऊ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी हे स्वत: व्यवस्थेची पाहणी करत आहेत.

 

Protected Content