जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांना महापालिकेतर्फे सील लावण्यात येत असून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनपा मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी मनपा मालकीची मार्केट उद्यापासून बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बंडू काळे उपस्थित होते.
राज्यात मागील आठ ते दहा वर्षात वेगवेगळ्या पक्षांचे सरकार सत्तेवर आले, मात्र कोणीही गाळेधारकांना न्याय मिळवून दिला नाही. यातच नूतन महापौर जयश्री महाजन यांनी पदभार स्वीकारताच गांधी मार्केटमधील एक गाळा सील करण्यात आला. याबाबत आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासोबत व जेष्ठ नगरसेवक सुनील महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील, उपायुक्त प्रशांत पाटील, डॉ. शांताराम सोनवणे, बंडू काळे, राजश कोतवाल, तेजस देवपूरा यांनच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असता आयुक्तांनी कायद्यातील अडचणी स्पष्ट केल्यात. अविकसित मार्केट मधील व्यावसायिक लाखोंचे बिले भरण्यास असमर्थ असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तसेच आयुक्तांना यातून मार्ग काढण्याबाबत विनंती करण्यात आली असता आयुक्तांनी थकबाकीतील ५० टक्के रक्कम भरण्याबाबत सांगितले. ही १६ मार्केटे अव्यावसायिक असल्याचे मनपानेच मान्य केले असून ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेली बिले भरू शकणार नसल्याचे डॉ. सोनवणे यांनी स्पष्ट केले. पालिकेत आता सत्तांतर झाले आहे आम्ही न्यायाची मागणी केलेली असतांना आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यत प्रशासनाने कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली. ना. गुलाबराव पाटील यांची गाळेधारकांनी भेट घेतली असता त्यांनी आयुक्तांनी कारवाई थांबविण्याचे आदेश दिले होते. मात्र, महापालिकेने गाळे सील करण्याच्या कारवाईस पुन्हा प्रारंभ केल्याने याचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्यापासून १६ मार्केट बंद ठेवण्यात येतील असे डॉ. सोनवणे यांनी स्पष्ट केले. याबाबत शासनाकडे दाद मागितली आहे. जोपर्यत यावर शासन दरबारी काही तोडगा निघत नाही तोपर्यत गाळे सील करण्याची कारवाई करण्यात येवू नये यामागणीसाठी उद्यापासून बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा डॉ. सोनवणे यांनी दिला.
भाग १
https://www.facebook.com/508992935887325/videos/146128087398510
भाग २
https://www.facebook.com/508992935887325/videos/476857760666626