यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली येथील हिन्दु मुस्लिम बांधवांचे एकतेचे प्रतिक म्हणून ओळख असलेल्या हजरत गैबनशाह वली यांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास उद्या दिनांक ११ जानेवारी पासून प्रारंभ होत आहे.
मागील दोन वर्षांतील कोरोना संसर्ग प्रार्दुभावाच्या वाढलेल्या गोंधळात सर्व सार्वजनीक कार्यक्रमांवर निर्बंध होते. यंदा मात्र कोणत्याही निर्बंधाविना कार्यक्रम होत आहेत. या अनुषंगाने यावल तालुक्यातील कोरपावली या गावातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली यात्रा ( उर्स शरीफ ) चे यंदा मोठया उत्साहात आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमासाठी परिसरातील तरूण वर्गात मोठा उत्साह दिसुन येत आहे.
कोरपावली गावातील मुख्य चौकातील हजरत पीर गैबंशह वली यांची दर्गा आहे. या ठिकाणी यात्रा निमित्ताने सर्व जातीधर्माचे ग्रामस्थ पिरबाबांच्या यात्रेत एकत्रीत येऊन दर्गावरील संदल शरीफ व कव्वालीचा कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवितात.
दरम्यान, दिनांक ११ जानेवारी बुधवार रोजी संदल शरीफ व १२ जानेवारी रोजी ऊर्स निमीत्ताने कव्वाली मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. या साठी हबीब अजमेरी , अजमेर, ( राजस्थान ) आणि परवीन तबस्सूम ( औरंगाबाद ) यांचा जंगी मुकाबला आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी ऊर्स निमीत्त एकत्रीत येऊन संदल यात्रा व कव्वालीच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन हिंदू मुस्लीम पंच कमिटी कोरपावलीच्या वतीने करण्यात आले आहे.