मुंबई प्रतिनिधी । आपल्याला कोविड योध्दा होता आले नाही तरी कोविड दूत तरी बनू नका असे बजावत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उद्यापासून राज्यभरात मिरवणुका, सार्वजनीक कार्यक्रम व आंदोलनांवर बंदी आणत असल्याची घोषणा केली. तसेच आजपासून मी जबाबदार ही मोहिम राबविणार असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले. ते आज जनतेशी संवाद साधतांना बोलत होते.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सायंकाळी सात वाजता राज्यातील जनतेशी संपर्क साधला. ते म्हणाले की, राज्य सरकारने कोरोनाच्या नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. आता लसीकरण सुरू करण्यात आले आहे. सर्वांनी कोरोनाच्या लढाईसाठी सज्ज रहायचे आहे. कोरोना सोबत आपण युध्द लढत आहोत. वॉर अगेन्स्ट व्हायरस असे याचे स्वरूप आहे. कोणत्याही लढाईसाठी ढाल आणि तलवार आवश्यक आहे. वार करण्यासाठी तलवार आणि वार रोखण्यासाठी ढाल ! कोरोना विरूध्दच्या लढाईत मास्क हे ढालीचे काम करणार आहे. यामुळे प्रत्येकाने मास्कचा वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, कोविडच्या आपत्तीतही महाराष्ट्राची वाटचाल सुरूच होती. आता कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. दुसरी लाट आली की नाही याचे चित्र पुढील पंधरा दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. विवाह, हॉटेल्स आदींसाठी आपण वेळा वाढवून दिल्या आहेत. मात्र कोरोनाने लावलेल्या शिस्तीचे पालन करण्याची आवश्यकता आहे. पाश्चात्य राष्ट्रांमध्येही कोरोनाबाबतची शिथीलता ही खूप महागात पडल्याचे दिसून आले आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपर्क तोडणे हाच एकमेव उपाय आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सार्वजनीक स्थळांवरील मास्क नसल्यास दंड ठोठावण्याची व्यापक मोहिम सुरू करण्यात आली असून मंगल कार्यालयांसह अन्य कार्यक्रमांच्या स्थळांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. आधी आपण माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम राबविली होती. मध्यंतरी अर्थचक्राला गती मिळाली. मात्र सर्व बाबी सुरू असतांना शिस्तीचा विसर पडला गेला. आपण कोरोना योध्दे बनत नसले तरी कोविड दूत तरी बनू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच उद्यापासून राज्यभरातील मिरवणुका, राजकीय कार्यक्रम, धार्मिक स्थळांवरील गर्दी आणि आंदोलनांवर बंदी घालण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तर माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेप्रमाणेच आता यापुढे मी जबाबदार ही मोहिम राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर लॉकडाऊन हवा की नाही याबाबत येत्या काही दिवसांमध्ये निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.