नवी दिल्ली (वृत्तसंस्थ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सुधारित नागरिकता कायद्याला घाबरायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सीएएचा अभ्यास करावा, असा सल्ला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी मंत्री मनिष तिवारी यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत सीएए, एनआरसी आणि एनपीए कायद्यांबाबत चर्चा झाली. सुधारित नागरिकता कायद्याला घाबरायची गरज नाही, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी अर्थात एनआरसी पूर्ण देशात लागू होणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता काँग्रेसचे मनिष तिवारी यांनी ट्विट करुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनपीआर हा एनआरसीचा भाग आहे, हे समजून घेण्यासाठी नागरिकता दुरुस्ती कायदा -2003 ची माहिती घेणे आवश्यक आहे. एकदा आपण एनपीआर लागू केल्यास आपण एनआरसी रोखू शकत नाही. तसेच भारतीय राज्यघटनेनुसार सीएएकडे पाहायला हवे, कारण धर्म हा नागरिकत्वचा आधार असू शकत नाही, असे मनिष तिवारी म्हणाले.