सातारा:वृत्तसंस्था । खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमधून चांदीची बंदूक चोरीला गेली होती. एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चांदीची बंदूक हस्तगत केली आहे. ही बंदूक शोभेची होती.
उदयनराजेंच्या पॅलेसमधून आरोपीने चांदीची बंदूक चोरली होती. सातारा येथील एका सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या व्यापाऱ्याकडे ती बंदूक विक्रीसाठी तो घेऊन जाणार होता. ही माहिती सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल गुसिंगे यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन फूट लांब, दीड किलो वजनाची चांदीची बंदूक सापडली. तिची किंमत अंदाजे १ लाख चार हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
दीपक सुतार असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, ही बंदूक उदयनराजे यांच्या पॅलेसमधून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.