नवी दिल्ली वृत्तसंस्था । सपा आणि बसपाने महाआघाडीची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने उत्तरप्रदेशात स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
रविवारी पक्ष मुख्यालयात काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी गुलाम नबी आझाद, प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांच्यासह पक्षाच्या मोठ्या नेत्यांची बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषदेत यातील निर्णयाबाबत माहिती देण्यात आली. यात काँग्रेस पक्ष स्वबळावर लढून भाजपाचा पराभव करण्याचा दावा गुलाम नबी आझाद यांनी केला. भाजपला हरविण्यासाठी जे पक्ष लढत आहेत त्या सर्वांशी आम्ही युती करायला तयार होतो मात्र सपा बसपाने त्यांचे मार्ग वेगळे केले. त्यांनी युती तोडली. त्यामुळे आता तो विषय संपला. आम्ही कुणाला जबरदस्ती नाही करू शकत त्यामुळे आता आम्ही एकटेच लढणार. आम्ही संपूर्ण तयारीनिशी निवडणूकीत उतरणार. २००९ मध्ये जसा काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये १ नंबरचा पक्ष ठरला होता तसेच आताही आम्ही एकटे लढू व यावेळी निर्णय आश्चर्यकारक असतील असा दावा त्यांनी केला.