उत्कृष्ट कार्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा होणार सन्मान

 

जळगाव, प्रतिनिधी । गरीब व गरजू रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावेत याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु झालेली आहे. या योजनेतून उत्कृष्ट कार्य झाल्याबद्दल राज्य शासनाने सर्वोत्तम सहा शासकीय रुग्णालयांचा सन्मान करण्याचे जाहीर केले आहे. त्यात जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा देखील समावेश असून जिल्ह्याच्या शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात रुग्णालयाचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे.

कोरोना विरहित रुग्णालय सुरु झाल्यावर जळगावच्या शासकीय रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरु झाली आहे. या योजनेसाठीचे कार्यालय रुग्णालयाच्या आवारात दर्शनी भागात असून येथे २ डाटा एंट्री ऑपरेटर सह नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. योजनेमधून २० जानेवारीपर्यंत ५२ कोरोना विरहित तर कोरोनाच्या ५० रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, गर्भवती महिला, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा, लहान मुलांचे आजार, डायलिसिस आदी आजाराने ग्रस्त रुग्णांना देखील लाभ झाला आहे. या कार्याचा गौरव करून राज्य सरकार राज्यातील सहा शासकीय रुग्णालयांचा सन्मान करीत आहे. यात जळगाव, अकोला, कोल्हापूर, लातूर, धुळे, मुंबई या शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे.

राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक), अन्नपूर्णा, अंत्योदय कार्ड कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु झाली आहे. यासाठी ओरिजनल आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीय बँकेचे पासबुक, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट या कागदपत्रांची आवश्यकता असते.

योजनेचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक तथा योजनेचे सचिव डॉ. वैभव सोनार, नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी माधुरी पाटील, अभिषेक पाटील हे रुग्णांसह नातेवाईकांना सहकार्य करून माहिती देत आहेत. ज्या रुग्णांना विविध आजारांवर उपचार घ्यायचे आहेत, त्यांनी रुग्णालयातील कार्यालयात संपर्क साधावा, अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांना संपर्क करावा असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

“राज्य शासन करणार असलेल्या सन्मानामुळे योजनेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या रुग्णालयातील सर्व घटकांना आणखी उत्तम कार्य मिळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.ज्या रुग्णांना उपचार करण्यासाठी आर्थिक अडचण आहे, त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून रुग्णालयातील उत्तम आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा” – डॉ. जयप्रकाश रामानंद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव.

Protected Content