नंदूरबार (वृत्तसंस्था) महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील नवापूर जवळील उच्छल येथे तापी नदीच्या बॅक वॉटरमध्ये बोट उलटून तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. तर बोटमधील ४ जण अद्यापही बेपत्ता आहेत.
गुजरातच्या उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील एक कुटुंतील १३ सदस्य होळीची सुट्टी असल्याने सहलीसाठी आले होते. त्यांनी उकाई धरणात बोटींग करण्यासाठी बोट घेतली. मात्र, बोटींग करत असताना भिंतखुद गावाजवळ वेगाने वारा आला आणि बोट अनियंत्रित होत, पाण्यात उलटली. पर्यटकांची बोट बुडाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आले. मात्र, अंधार पडल्याने शोध मोहिम थांबवण्यात आली. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थ आणि मासेमारी करणाऱ्या लोकांनी ६ जणांचे प्राण वाचवले. या अपघातात नवापूर तालुक्यातील दोन जणही बेपत्ता आहेत.