जळगाव, प्रतिनिधी । येथील दुधफेडरेशनच्या मागील बाजूस असलेल्या राजमालतीनगरमध्ये पतीने आंघोळीचे उकळते पाणी टाकल्याने महिला भाजल्याने तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी फरजानाबी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, राजमालतीनगरातील प्लॉट नं. ७ येथे फरजानाबी, पती जाबीर शेख, मुल अश्पाक व शोएब अशांसह वास्तव्यास आहेत. पती जाबीर सुपारी फोडण्याचे काम करतात तर फरजाना या धुणीभांडी करुन संसाराला हातभार लावतात. आज रविवार (ता.१४) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे मुलं व पतीसाठी नाष्टा व स्वयंपाकासाठी फरजाना कणीक मळत होत्या, त्याच वेळेस पती जाबीरशेख अंघोळीला जाणार असल्याने बाथरुम मध्येच बादलीत हिटर लावुन पाणी तापवण्यात येत होते. बादलीतील पाणी उकळल्यावर पती जाबीर याने काहीएक न बोलता उकळत्या पाण्याची बादली उचलून फरजाना यांच्या अंगावर उलटी केली. अचानक अंगावर उकळते पाणी पडल्याने किंचाळ्या मारतच फरजाना धावत सुटल्या. दोघा मुलांनी मदतीला धाव घेतल्यावर जाबीर यांनी दोघा मुलांना मारहाण केली. जावाई गुलाब शेख व दोघा मुलांनी जखमी फरजाना यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असुन त्यांच्या जबाबावरुन पती जाबीर यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.