इतर राज्यांमध्येही होतो ईडीचा गैरवापर : शरद पवार

पुणे | फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही ईडीचा गैरवापर केला जात आहे. विरोधकांना नमवण्याचा केंद्राकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

 

आज येथे पत्रकारांशी बोलतांना शरद पवार म्हणाले की, ईडी, सीबीआय आदी यंत्रणांचा आतापर्यंत या देशात असा कधी वापर झाला नव्हता. मात्र, हल्लीच्या सरकारने ही यंत्रणा विरोधकांना नमवण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. पंजाब, राजस्थान मध्यप्रदेश आणि दक्षिणेतील काही राज्यात हेच सुरू आहे. आपण केवळ महाराष्ट्रातील कारवायांवर चर्चा करतो. पण हा गैरवापर महाराष्ट्रापर्यंत सीमित नाही तर हा गैरवापर इतर राज्यातही सुरू आहे, असं पवार म्हणाले.

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं विधान परिषदेतील आमदारांच्या यादीतून नाव कापल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर पवारांना विचारण्यात आलं असता पवारांनी या आरोपात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. ते नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. राष्ट्रवादीने जी यादी राज्यपालांना दिली आहे त्यात राजू शेट्टी यांचं नाव आहे. राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीत क्षेत्रात योगदान दिलं आहे. ते पाहून त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं असा प्रस्ताव आम्ही राज्यपालांना दिलेला आहे. त्याचा अंतिम निर्णय राज्यापालांकडून आलेला नाही. त्यामुळे अंतिम भूमिका राज्यपालांना घ्यायची आहे, असं ते म्हणाले.

Protected Content