जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरानाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता बाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावे. याकरीता जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळावे याकरीता प्रशासनाने येथील इकरा युनानी महाविद्यालयात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार केले आहे. याठिकाणी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, इकरा एज्युकेशन सोसायटी व विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींच्या मदतीने ५० ऑक्सिजनयुक्त बेड तयार करण्यात आले असून ५० बेडची सुविधा तयार करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय याठिकाणी १०० व्यक्तींच्या सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
या हॉस्पिटलला आज सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी भेट देऊन येथील सोयीसुविधांची पाहणी केली. तसेच याठिकाणी आवश्यक असणारा वैद्यकीय स्टॉफ जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उपलब्ध करुन दिला असून अजून आवश्यकता भासल्यास स्टाफ देण्याच्या सुचना संबंधितांना केल्यात. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ज्या बाधित रुग्णांना कोरोनाची मध्यम व सौम्य लक्षणे आहेत, परंतु त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. अशा रुग्णांवर याठिकाणी उपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात तीव्र लक्षणे असणाऱ्या ५० रुग्णांना बेड उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याठिकाणी दाखल होणाऱ्या रुगणांवर चांगल्या प्रकारचे उपचार करतानाच त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा, चहा, नाश्ता, जेवण चांगल्या दर्जाचे व वेळेवर उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही श्री. राऊत यांनी सर्व संबंधितांना दिलेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकणी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांचेसह इकरा एज्युकेशन सोसायटीचे अब्दुल करीम सालार, अब्दुल गफार मलीक, इक्बाल शाह, रेडक्रॉस सोसायटीचे गनी मेनन, अनिल कांकरीया, डॉ. शोएब शेख आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या हस्ते कोविड हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मदत करणारे तसेच जिल्ह्यातील नागरीकांना मोफत वाटप करण्यात येणाऱ्या आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांच्या निर्मितीसाठी मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कोविड हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मदत करणाऱ्या सर्वांचे जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी कौतुक करुन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलसाठी दानशूर व्यक्तींने पुढे येण्याचे आवाहन केले.