मुंबई : वृत्तसंस्था । कंगनाने देशाचं ‘इंडिया’ हे नाव बदलून ‘भारत’ असं करण्याची इच्छा व्यक्त केलीय. ‘इंडिया’ हे नाव ब्रिटीशांनी ठेवलं असून ते गुलामगिरीची आठवण करून देणारं आहे, असं ती म्हणाली.
अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत राहते. कगनाचं ट्विटर अकाऊंट बंद झालं असलं तरी इन्स्टाग्राम आणि आता कू अॅपवरून कंगना तिचं मत मांडत असते. नुकतीच कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमुळे कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कंगनाने तिच्या पोस्टमध्ये देशाचं नाव बदलण्याची गरज असल्याचं म्हंटलं आहे. कंगनाने यावेळी इंडिया आणि भारत या शब्दांचा अर्थ तिच्या पोस्टमध्ये स्पष्ट केलाय.
भारत शब्दाचा अर्थ सांगताना कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हणाली,” ब्रिटीशांनी आपल्याला ‘इंडिया’ हे गुलामीचं नावं दिलंय. ज्याचा अर्थ केवळ सिंधू नदीच्या पूर्वेकडील देश असा होतो. आपण एखाद्या लहान मुलाला ‘लहान नाक’,’दुसरा मुलगा’ किंवा त्याहून वाईट म्हणजे ‘सी-सेक्शन’ अशा नावाने उल्लेख करू का? हे कसलं नाव आहे? ” असं म्हणत तिने भारत या शब्दाचा अर्थ सांगितला. “भारत हा संस्कृत शब्द आहे. भा म्हणजे भाव. र म्हणजे राग आणि त म्हणजे ताल असा आहे. गुलाम होण्याआधी आपण सांस्कृतिक आणि कलात्मकतेच्या बाबतीत खूपच विकसित होतो.” असं कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.
कंगनाने कू अॅपवर आणि फेसबुकवर देखील यासंदर्भात तिचं मत मांडलं आहे. “आपण जर असेच पाश्चिमात्य देशाच्या नावाची कॉपी बनून राहिलो तर आपला देश कधीच प्रगती करू शकणार नाही. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्राचीन ज्ञानाची मदत घेवून विकास करणं गरजेचं आहे. भारत तेव्हाच पुढे जईल जेव्हा आपण आपली प्राचीन सभ्यता आणि संस्कृती यावर विश्वास ठेवून त्या मार्गाने पुढे जाऊ.” असं म्हणत कंगनाने सर्वांनी योग, वेद आणि गीता यांचं अनुकरण करणं गरजेचं असल्याचं म्हणालीय. यावेळी पुन्हा एकदा कंगनाने देशाचं नाव इंडियावरून भारत करावं असं मत मांडलं आहे.
कंगना रणौत बॉलिवूडसह देशातील विविध घडामोडींवर भाष्य करत असते. तिला अनेकदा ट्रोल देखील व्हावं लागतं.