आ. किशोर पाटील यांनी केले स्व.आर.ओ.(तात्या) पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पूजन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आ. किशोर पाटील यांनी २४ एप्रिल रोजी स्व. आर. ओ. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पुजन व माल्यार्पण केले.

निर्मल सिड्स समूहाच्या वतीने स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या दोन पुतळ्यांचे अनावरण करण्यासाठी २३ एप्रिल रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पाचोरा शहरात आले होते. या निमित्ताने त्यांची जाहीर सभा देखील झाली. यासभेत मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आ. किशोर पाटील यांना देखील आमंत्रीत करण्यात आले होते. परंतु राजकीय वाटा वेगवेगळ्या झाल्याने आमदार जाऊ शकणार नव्हते. परंतु आमदार किशोर पाटील यांनी २४ रोजी स्व. तात्यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार आ. किशोर पाटील यांनी २४ सोमवार रोजी निवासस्थाना पासून शेकडो शिवसैनिकांसह बाईक रॅली काढुन भडगाव रोड निर्मल सिड्सच्या जैव तंत्रज्ञान प्रयोगशाळा आवारातील स्व. तात्यासाहेबांच्या पुतळ्याची ब्राम्हणा द्वारे विधिवत पुजा व दुग्धाअभिषेक करून आई श्रीमती नर्मदा पाटील यांचे सह सपत्नीक तात्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यावेळी माजी नगराध्यक्षा सुनीता किशोर पाटील, कन्या प्रियंका पाटील मुलगा सुमित पाटील, प्रताप हरी पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष बंडू चौधरी, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, संजय पाटील (भुरा आप्पा), शशी येवले, स्विय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण पाटील, समाधान पाटील आदीं सह पाचोरा – भडगाव तालुक्यातील पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी संवादात आमदार म्हणाले की, तात्यासाहेब माझे पितृतुल्य आणि राजकीय गुरू होते. आज मी जे काही आहे त्यांच्याच मुळे आहे. माझा राजकारणाशी कोणताही संबंध नव्हता. मी पोलीस खात्यात होतो. तात्या आमदार झाल्यानंतर त्यांनी जळगाव येथे येवून मला सांगितले की, किशोर शेतकऱ्यांसाठी वैभवशाली काम करायचे आहे. मतदार संघात पक्षाचे व राजकीय कार्य करण्यासाठी मला तुझी गरज आहे, तु पोलीस खात्याच्या राजीनामा देवून माझ्यासोबत काम कर अथवा मी आमदारकीचा राजीनामा देतो. मी तात्यांचा आदेश शिरसावंदय मानून क्षणाचाही विलंब न लावता पोलीस पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तात्यांनी एक कार्यक्रमात मला त्यांचा राजकीय वारसदार म्हणून घोषित केले होते. २३ एप्रिल रोजी स्व. तात्यांचे पुतळ्याचे अनावरण ज्यांच्या हस्ते झाले ते विधीवत करण्यात आले नाही. म्हणून मी आज तात्यांना लहाणपणी त्यांचा सांभाळ करणाऱ्या व दुध पाजणाऱ्या माझ्या मातोश्री नर्मदा आईंच्या हस्ते सपत्नीक दुग्ध अभिषेक व पूजन केले. तात्यांचे दोन स्वप्न होते. एक म्हणजे तिनवेळा आमदार होऊन हॅटट्रिक करण्याचे आणि दुसरे खासदार होण्याचे. परंतु दुर्धर आजारामुळे तात्यांचे निधन झाल्याने ही स्वप्न अपूर्ण राहिली. ते दोन्ही स्वप्न मी पूर्ण करण्याचा तात्यांच्या चरणी संकल्प करीत असून त्या दिशेने आजपासून वाटचाल करणार असून मीच स्व. तात्यासाहेबांचा खरा राजकीय वारसदार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

Protected Content