जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा गावाजवळ एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांनी मंगळवारी रात्री ८ वाजता धाड टाकली. मात्र, जुगारींना पोलिसांची चाहुल लागल्याने सर्वांनी पळ काढला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून १७ दुचाकी व ३४५० रुपये जप्त केले. दरम्यान, हा जुगार अड्डा चालवण्यासाठी बड्या हस्तीचाही सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.
आसोदा गावालगत स्मशानभूमीच्या मागे एका शेतात गेल्या काही दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे, उपनिरीक्षक कदीर तडवी, वासुदेव मराठे, चेतन पाटील, लालसिंग पाटील, सुधाकर शिंदे, विलास शिंदे, शैलेश चव्हाण, पोपट सोनार, साहेबराव पाटील, अरुण पाटील यांच्या पथकाने आसोदा गावात धाव घेत छापा मारला. दरम्यान, पोलिसांचे पथक आल्याचे पाहताच जुगारींनी हातातील जुगाराचे साहित्य, पैसे, दुचाकी जागेवरच सोडुन पळ काढला. परंतू, त्यांच्या १७ दुचाकी जप्त केल्या. या सर्व दुचाकी एका ट्रकमधून तालुका पोलिस ठाण्यात आणल्या आहेत.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अक्षय तृतीयेच्या निमित्ताने हा जुगार अड्डा काही दिवसांपासून जोरात सुरू होता. जळगाव शहरातील अनेक बड्या हस्ती या शेतात जुगार खेळण्यासाठी जात होत्या. मंगळवारी पोलिसांनी छापा मारला तेव्हाही तेथे अनेक लोक हजर होते.