मुंबई : वृत्तसंस्था । अभिनेता बॉबी देओल याची आगामी ‘आश्रम 2’ ही वेब सीरिज प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. करणी सेनेने प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
धार्मिक भावना दुखावल्या म्हणून ही नोटीस बजावण्यात आली आहे. ‘आश्रम’ या वेब सीरिजच्या माध्यमातून बॉबी देओलने डिजिटल विश्वात पदार्पण केलं असून त्याची ‘आश्रम 2’ ही नवीन सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
करणी सेनेच्या राज्य संघटनेचे सरचिटणीस सुरजित सिंह यांनी प्रकाश झा यांना ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. प्रकाश झा यांच्यासोबत ‘एमएक्स प्लेअर’ या ओटीटी प्लॅटफॉर्मलादेखील नोटीस बजावली आहे. आश्रम या वेब सीरिजमधून धार्मिक परंपरा, प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि आश्रम धर्म यांच्याविषयी चुकीचा समज परसविला जात असल्याचं करणी सेनेने म्हटलं आहे.
‘आश्रम-चॅप्टर-2- द डार्क साइड’ या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात ट्रेलरमध्ये हिंदू चालीरिती आणि आश्रम व्यवस्थेविषयी भाष्य करण्यात आलं होतं. ‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल व्यतिरिक्त अदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ही सीरिज येत्या ११ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.